माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे वेव्ज 2025 ची घोषणा
कंटेंट मार्केट हे वेव्ह्जचे वैशिष्ट्य
मुंबई, 14 डिसेंबर 2024माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेची (WAVES 2025) ची घोषणा केली असून 5-9 फेब्रुवारी 2025 या कालावधीत नवी दिल्ली मधील भारत मंडपम येथे वेव्ह्ज चे आयोजन करण्यात आले आहे. वृंदा मनोहर देसाई, सहसचिव (चित्रपट) यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या गोलमेज चर्चेत उद्योग क्षेत्रातले प्रमुख हितधारक शिखर परिषदेच्या कार्यसूचीची रूपरेषा तयार करण्यासाठी एकत्र आले होते . वेव्ह्ज 2025 मध्ये प्रदर्शन मंडप, कंटेंट मार्केट (वेव्ह्ज बाजार), स्टार्ट-अप एक्सीलरेटर्स (WaveXcelerator), आणि नेटवर्किंग हब असतील जेणेकरून निर्मिती संस्था , गुंतवणूकदार आणि तंत्रज्ञान प्रदाते यांच्यातील भागीदारीला चालना मिळेल.
या शिखर परिषदेचे उद्दिष्ट भारताला मीडिया आणि मनोरंजनाचे जागतिक केंद्र म्हणून स्थापित करणे, विविध प्रकारच्या सहकार्यासाठी/भागीदारीसाठी अतुलनीय संधी प्रदान करणे आणि भारतीय प्रतिभा प्रदर्शित करणे हे आहे. उद्योग प्रतिनिधींनी सहभागासाठीच्या योजनांवर चर्चा केली, ज्यात आशय प्रकाशन आणि या शिखर परिषदेचा प्रभाव वाढवण्यासाठी वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचा समावेश आहे.
वेव्ह्ज 2025 हे प्रतिनिधींसाठी तीन दिवस खुले असेल आणि शेवटचे दोन दिवस ते सामान्य जनतेसाठी खुले असेल. या ठिकाणी उपस्थितांना एक उत्तम अनुभव मिळेल असे नियोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची अधिक माहिती wavesindia.org या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
वेव्ह्ज बद्दल
वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट (WAVES) हा मीडिया आणि मनोरंजन उद्योगात चर्चा, सहयोग आणि नावीन्यपूर्णतेला चालना देण्यासाठी एक प्रमुख मंच आहे. हा कार्यक्रम उद्योगातील आघाडीचे नेतृत्व, भागधारक आणि नवोदितांना एकत्र आणून विविध शक्यता/ संधी , आव्हाने, जागतिक व्यापाराला चालना देण्यासाठी आणि क्षेत्राच्या भविष्यावर प्रभाव टाकण्यासाठी एक चर्चात्मक व्यासपीठाचे कार्य करेल. आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाद्वारे आकर्षक आशय तयार करून, देशातील विविध भौगोलिक प्रदेशांमधील प्रतिभांसह मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात भारताचे एक प्रमुख स्थानआहे. ही परिषद आशय निर्मिती, गुंतवणुकीचे स्थान आणि ‘क्रिएट इन इंडिया’ संधी तसेच जगभरात पोहचण्यासाठी भारताला ‘वन-स्टॉप डेस्टिनेशन’ म्हणून प्रोत्साहन देईल