पुणे : समाजातील आदर्शवत महिलांचा सन्मान व्हावा, याउद्देशाने नारी तू नारायणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून यंदाच्या वर्षी लाठी-काठीचे खेळ करणा-या शांताबाई पवार, डॉ.मिनू अग्रवाल आणि समाजसेविका आभा भागवत यांचा सन्मान करण्यात आला. श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग येथे झालेल्या कार्यक्रमाला ट्रस्टचे विश्वस्त व पदाधिकारी उपस्थित होते. या महिलांच्या हस्ते देवीची आरती देखील करण्यात आली.
श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सवात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा नारी तू नारायणी पुरस्कार देऊन मंदिरात सन्मान करण्यात आला. यावेळी मंदिराचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त डॉ. तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, प्रविण चोरबेले, अॅड.प्रताप परदेशी, हेमंत अर्नाळकर आदी उपस्थित होते.
शांताबाई पवार म्हणाल्या, लाठी-काठीचे खेळ करुन ज्यांना आई-वडिल नाहीत, अश मुलांचा मी सांभाळ केला. त्या मुलांसाठी रस्त्यावर उतरले. काठया फिरवून मुलांचे शिक्षण केले. तब्बल २० मुलांच्या कुटुंबाचे पोट मी भरत असून अशा सन्मानामधून या कार्यासाठी उर्जा मिळते.
डॉ.मिनू अग्रवाल म्हणाल्या, महिला सबलीकरणाची चर्चा सर्वत्र होत असते. नवरात्रीचा उत्सव हा महिलांचा सन्मान करणारा उत्सव असतो. त्यामुळे सर्व महिलांना सकारात्मकतेसोबत उर्जा देखील मिळते, असेही त्यांनी सांगितले. आभा भागवत म्हणाल्या, प्रत्येक माणसाला चित्र काढता येते. महिलांना रांगोळी, मेहेंदी काढून व्यक्त होता येते. त्यामुळे सर्वांनी आपल्यामधील कला जोपासायला हवी.
विश्वस्त डॉ. तृप्ती अग्रवाल म्हणाल्या, त्यामुळे विविध क्षेत्रात उच्चपदस्थ महिला असून अनेकजणी वेगळ्या प्रकारचे काम समाजात करीत आहेत, त्यांच्या कार्याचा गौरव व्हायला हवा. गेली अनेक वर्षे मंदिरात सातत्याने हा उपक्रम राबविला जात आहे. तसेच श्री महासरस्वती, श्री महालक्ष्मी आणि श्री महाकाली अशी देवीची तिन्ही रुपे एकाच ठिकाणी आपल्याला पहायला मिळतात. त्यामुळे या कर्तृत्ववान महिलांच्या हस्ते देवीची आरती देखील केली जाते, असेही त्यांनी सांगितले. विश्वस्त प्रविण चोरबेले यांनी आभार मानले.