भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची चौकशीची मागणी
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातील विशिष्ट समुदायाच्या मतांचे एकत्रीकरण करण्यासाठी राज्यात धार्मिक तेढ वाढवून राजकीय फायदा मिळविण्याचे षडयंत्र सुरू असून यास कोणत्या नेत्यांची फूस आहे याची चौकशी करावी अशी मागणी प्रदेश भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. (Mr Upadhaye alleges attempt to create bitterness between communities)
भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुतीस मतदान करणारा मुस्लिम नव्हेच, अशा शब्दांत महायुतीच्या विरोधात धार्मिक विखार पेरणाऱ्या एका धर्मगुरुचा व्हिडियो समाजमाध्यमांवरून सर्वत्र फैलावला असताना, वोट जिहाद या विखाराचा आणखी कोणता नवा पुरावा निवडणूक आयोगास हवा, असा सवालही उपाध्ये यांनी केला. (Mr Upadhaye alleges that videos of religious gurus being circulated)
वोट जिहाद हा काल्पनिक प्रकार नसून विशिष्ट धार्मिक समुदायास महायुतीच्या विरोधात मतदान करण्याकरिता धार्मिक बाबींना पुढे करून धमकावण्याचे प्रकार सुरू असल्याचे लोकसभा निवडणुकीतच समोर आले होते. अशा वोट जिहादी संकल्पनेमुळे महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी किमान 14 मतदारसंघांत वोट जिहादचा प्रभाव दिसून आल्याने, या समुदायाच्या मतदारांनी हिंदुत्ववादी विचाराच्या उमेदवारांच्या विरोधात जाणीवपूर्वक मतदान केले, हा वोट जिहादचाच प्रकार होता. अशा प्रकारास फूस लावण्यासाठी महायुतीच्या विरोधातील काही राजकीय नेत्यांनी विशिष्ट समुदायांच्या नेत्यांशी हातमिळवणी केली असून त्या समुदायाच्या धार्मिक हितरक्षणाची आश्वासने देऊन त्यांना युतीविरोधी मतदानास भाग पाडले, असा आरोपही त्यांनी केला. अगदी अलीकडे, मुस्लिम समुदायाच्या एका नेत्याने मुस्लिमांना महायुतीच्या विरोधात मतदान करण्याचे जाहीर आदेश दिल्याची ध्वनिचित्रफीतच समोर आल्याने वोट जिहादचे राजकीय षडयंत्र स्पष्ट झाले असून, मुस्लिमांनी महायुतीस मतदान करू नये असे स्पष्ट आदेश या नेत्याने दिल्याचे या चित्रफितीमध्ये दिसते, असे सांगून उपाध्ये यांनी ती ध्वनिफीतच प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना ऐकविली.
लोकसभा निवडणुकांच्या आसपास मुस्लिम मतांचे एकगठ्ठा एकत्रिकरण करण्यासाठी शिवसेना उबाठा गटाचे तसेच शरद पवार गटाचे नेते सक्रिय झाल्याची शंका व्यक्त होत होती, उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी तर मुस्लिम समुदायाच्या नेंत्यांचा पाहुणचार करून, देशातील सीएए कायदा अंमलात येणार नाही यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिल्याचा आरोपही उपाध्ये यांनी केला. संपूर्ण देश ज्या कायद्यासाठी आग्रही आहे, तो कायदा लागू करू नये या मुस्लिम समुदायातील काही नेत्यांच्या मागणीस पाठिंबा देणारे ठाकरे आता वोट जिहादला प्रोत्साहन देत आहेत का, असा सवालही श्री. उपाध्ये यांनी केला. याच समुदायाच्या नेत्यांनी उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवशी त्यांना शाल पांघरली आणि तलवार भेट दिली होती, याकडेही उपाध्ये यांनी लक्ष वेधले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांस हरताळ फासून मुस्लिम लांगूलचालन करणाऱ्या उद्धव व आदित्य ठाकरे यांच्या प्रेरणेमुळे वोट जिहादचा प्रकार महाराष्ट्रात फोफावेल अशी भीती उपाध्ये यांनी व्यक्त केली. त्यांची फूस असल्यामुळेच मुस्लिमांना महायुतीच्या विरोधात मतदान करण्याचे जाहीर आवाहन करण्याचे प्रकार धार्मिक नेत्यांकडून सुरू असल्याचा आरोपही उपाध्ये यांनी केला.