ज्येष्ठ विचारवंत डॉ. रमेश पांडव : रा. स्व. संघ, सामाजिक समरसता मंच आणि जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने ‘भारतीय संविधान आणि समरसता’ व्याख्यान
पुणे : संपूर्ण देश कसा चालावा, या देशात जो राहतो त्याने एकमेकांशी व्यवहार कसा करावा, समाजाची रचना कशी असावी हे सांगणारे संविधान हे आमचे धर्म पुस्तक आहे. संविधानाच्या पुढे इतर कोणते ही पुस्तक नगण्य आहे. जुन्या प्रकारची सामाजिक रचना ७५ वर्षांपूर्वी संपली आणि संविधानिक समाजरचना अस्तित्वात आली ती संविधानामुळे, असे मत ज्येष्ठ विचारवंत आणि रा. स्व. संघ, सामाजिक समरसता मंच अखिल भारतीय समरसता गतिविधि मंडल सदस्य डॉ. रमेश पांडव यांनी व्यक्त केले.
रा. स्व. संघ, सामाजिक समरसता मंच आणि जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने भारतीय संविधान आणि समरसता या विषयावर डॉ. रमेश पांडव यांच्या व्याख्यानाचे आयोजन नऱ्हे येथील जाधवर शैक्षणिक संकुलात करण्यात आले होते. यावेळी पुणे महानगर समरसता गतिविधि संयोजक शरद शिंदे, सिंहगड भाग सह कार्यवाह दत्ताजी काळे, नऱ्हे नगर कार्यवाह संजय सुपलकर उपस्थित होते. संस्थेचे उपाध्यक्ष अॅड.शार्दुल जाधवर यांनी याकरिता विशेष मार्गदर्शन केले.
डॉ. रमेश पांडव म्हणाले, जेव्हा जेव्हा जातीचा उल्लेख येतो तेव्हा त्याचा अर्थ असतो व्यवसाय. पूर्वी व्यवसाय कोणी करावा याला मर्यादा होत्या परंतु आता मर्यादा राहिल्या नाहीत. कोणत्याही जातीत जन्म झाला असेल तरीही व्यवसाय कोणी कोणता करावा याला मर्यादा नाहीत. आताच्या काळात विद्यापीठांमध्ये नवीन तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण मिळते. म्हणून आता जुन्या जातींचा संदर्भ उरला नाही. समरसता हा अंतकरणाचा भाव आहे, आणि तो निर्माण होण्यासाठी संविधान हे आधारभूत ग्रंथ आहे.